CORONA and my relative – कोरोना आणि माझा नातेवाईक
मित्रांनो आता तुम्हाला माहीतच आहे, कोरोना(COVID-19) महामारीने काय थैमान घातलं आहे, त्याबद्दल वेगळं सांगायची गरज नाही, शाळा, कॉलेज, ऑफिस, ट्रान्सपोर्ट सेवा, कारखाने, दुकाने इत्यादी बंद आहेत, Lock-down सुरू होऊन जवळपास 2 महिने होऊन गेले आहेत.
लोकांना खूप सहन करावं लागत आहे, काम बंद, शिवाय खर्च ही येत आहे, त्यामुळे लोकं शहरकडून गावाकडे जाण्यासाठी धडपड करत आहेत.
फोनवरील संभाषण…
आज मला माझ्या जवळच्या नातेवाईकाचा फोन आला. माझी चौकशी करायला फोन केला होता. मला म्हणतो “गावाला आला आहेस का?” मी म्हटलं “नाही”, मग कोरोना विषयी आमच्यात चर्चा झाली, मग तो मुद्यावर आला, म्हणतो की “अरे सुहास खूप प्रॉब्लेम झाले आहेत,” “मी विचारलं काय झालं,” तो म्हणाला की “आम्ही सर्वजण मार्च महिन्यात गावाला आलो आहे,” “थोडेफार पैसे आणलेले ते ही संपले.” शिवाय तो जिथे काम करत होता तिथून त्याचा मार्च महिन्याचा पगार ही त्याच्या मालकाने दिला.
पण एप्रिल, मे महिन्याचा पगार नाही, कारण जिथे काम करत होता ते हॉटेल अजून पर्यंत बंद आहे. तर तो मालक पगार कसा देणार, हे सुद्धा आपल्याला समजायला हवं ना. असं सर्व तोच कथन करत होता.
अगोदर असलेले दुखणेही त्रास देऊ लागले आहेत, आणि गावाला 5-6 माणसे गेल्यावर, सर्व विकतच आणावं लागणार, काय होते नव्हते तेवढे पैसे संपले. उसने पैसे घेतलेले, ते कसे काय पुरणार!
मी म्हटलं ठीक आहे, मग माझ्याकडून तुला काय मदत हवी आहे,
तो म्हणाला की, “मला थोडे पैसे पाठवून दिलेस, तर खूप बरं होईल”,
मी सांगितलं त्याला की, पैसे बँकेत ट्रान्सफर करतो, हे ऐकून कदाचित त्याला हायसं वाटलं.
आता मी त्याला विचारलं, मी काही सांगू का?
तो बोलला “सांग ना”?
कोरोना महामारीने काय शिकवलं?
मी त्याला प्रश्न विचारला की, कोरोना महामारीने काय शिकवलं? आणि तू काय शिकलास?
तो म्हणला की, असे दिवस माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले, म्हणजे काम न करता घरी बसून राहणे, ते ही आपल्याला तो रोग होऊ नये, आणि आपला जीव वाचावा, म्हणून सतत स्वतःची काळजी घेतंच आहोत.
पण आता स्वतःचं आणि कुटुंबाचं पोट भरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अश्या परिस्थितीत कोणाकडे उसणे पैसे मागायलाही धीर होत नाही, आणि दिलेच कोणी तर कर्जबाजारी होण्याचीही भीती वाटते.
मी म्हणालो, बघ गावाकडे नुसते घर असूनही चालत नाही, उदरनिर्वाह करण्यासाठी लागतो पैसा, तो कोणी फुकट देणार नाही, आणि जरी उसणे घेतले, तरी त्या व्यक्तीला ते परत करावेच लागणार!
बघ गेले 2 वर्षांपासून मी तुला सांगत आहे, पैसे कुठेतरी बचत कर.
अरे तुमच्या घरातील 3 माणसे कामाला जातात, आणि साधे हजार रुपये तुमच्याकडे शिल्लक राहत नाहीत. जेव्हा तुमच्याकडे पैसे पगारातून घरी येत होते, तेव्हा तुम्ही बचत का केली नाही? अजून मुलांची लग्ने सुद्धा होणार आहेत, शिवाय तुझी रिटायरमेंट देखील आहे.
यासाठी काय करणार आहेस, का फक्त कर्ज काढायची आणि ती वर्षानुवर्षे फेडत राहायची?
बघ जरा विचार कर, अजूनही वेळ गेली नाही!
जरा सावर स्वतःला!
इतकं सांगितल्यावर थोडं त्याच्या लक्ष्यात आलं.
आणि स्वतःहून बोलला की, माझं चुकलं, त्यावेळी तुझं म्हणणं दुर्लक्ष केलं.
असे काही मार्ग आहेत का? आपले पैसे आपण सुरक्षित कुठेतरी योग्य ठिकाणी बचत करू शकतो का?
मी हो म्हटलं.
आर्थिक नियोजनासाठी मार्गदर्शन…
आपण आर्थिक नियोजन(Financial Planning) करू शकतो. आणि फार थोड्या पैशांपासून सुरुवात केलीस, तर कालांतराने बऱ्यापैकी पैसे जमा होतील.
जरी परत कोरोना सारखी परिस्थिती निमार्ण झाली, तरी तू त्यातून सावरशील.
याबद्दल थोडक्यात सांगितलं.
आपण भेटू आणि सवित्तर चर्चा करू! मी त्याला धीर दिला, आणि म्हटलं, काळजी करू नकोस, हे सुद्धा दिवस निघून जातील, सर्व काही ठीक होईल.
मग आम्ही तिथेच बोलणं थांबवलं आणि फोन ठेवला!
मित्रांनो बघा, माझ्या या नातेवाईकाला गेले 2 वर्षापासून सांगत आहे, की पैसे गुंतवणूक कर!
पण हे त्याला समजण्यासाठी कोरोना सारखी परिस्थिती यावी लागली.
अशी वेळ कोणावरच येऊ नये, त्यासाठी आपल्याला कोरोना महामारी आली, म्हणून नाही तर नेहमीच आर्थिक संकटांना(Financial crises)सामोरे जाता आलं पाहिजे! त्याची अगोदरच तजवीज करून ठेवली पाहिजे!
मग आपल्याला काय करायला पाहिजे, तर नोकरी आणि व्यवसाय यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून किमान 3 ते 6 महिन्यांचा घर खर्च(Monthly Expenses), कर्जाचे हप्ते(Loans EMI) आणि मेडिकल खर्च(Medical Expenses) यासाठी बचत(Savings) किंवा गुंतवणूक(Investment) करायलाच हवी. म्हणजेच काय तर आकस्मित निधी(Emergency fund) साठी पैसे जमवले पाहिजेत.
मग तुम्ही पण तयार आहात ना, आर्थिक संकटांना सामोरे जायला!
तुम्हाला हा लेख कसा वाटला, याबद्द्ल तुमचा अभिप्राय कळवा. लवकरच भेटू!
नवीन विषय! नवीन लेख! फक्त आपल्या मराठी मातृभाषेत!
सारा इन्वेस्ट्मेन्ट्स
सुहास जोगळे
0 Comments